ठाणे (मीरा भाईंदर) - मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील चेना नदीवर पूल व बंधारा बांधकामाच्या एकूण ३० कोटी रकमेस राज्य शासनाने निधीसह मान्यता दिली आहे. या कामासाठी राज्य सरकार ३० कोटी रुपये खर्च करणार आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्यात ४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येईल, असे राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने म्हटले आहे.
चेना नदीचे पाणी गेले अनेक वर्षे वाया जात आहे. नदीचे पाणी अडवून त्याचा सदुपयोग व्हावा
पावसाळ्यात चेना नदी पूर्ण क्षमतेने वाहत असते. या नदीत येणारे पाणी अडवून त्या पाण्यातून मीरा भाईंदर परिसरासाठी लघू पाणी पुरवठा योजना तयार करावी, येथे बंधारा बांधला जावा, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्यसरकारकडे केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन समिती सभागृहात ठाणे जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात बैठक झाली. या बैठकीत आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर शहरातील विकास कामांबाबत चर्चा करतानाच चेना नदीचा मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर बैठकीत मांडला व त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.
आमदार सरनाईक यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांसह चेना नदीच्या परिसरात मार्चमध्ये पाहणी केली होती. याठिकाणी कोणता प्रकल्प होऊ शकतो याची सविस्तर पाहणी करून प्राथमिक अभ्यास करण्यात आला होता. त्यावेळी या नदीवर पूल व बंधारा बांधून पाणी अडवायचे व मीरा भाईंदर शहराला या पाण्याचा पुरवठा करायचे असे ठरले होते. सरनाईक यांच्या विनंतीनुसार जलसंपदा विभागाने सर्वे करून येथे पूल-बंधारा बांधण्याचे डिजाईन तयार केले होते. आता चेना नदीवरील पूल बांधकाम करणे या कामासाठी एकूण ३० कोटींच्या खर्चाला सरकारने मान्यता दिली आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने ठाणे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून या प्रकल्पाला मंजुरी दिल्याची माहिती दिली आहे.