महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

मुंबईतील लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी - Citizens crowd on vaccination center Mumbai

मुंबईत कोरोनाचा प्रसार गेले वर्षभर आहे. हा प्रसार रोखण्यासाठी मुंबईत गेले तीन महिने लसीकरण सुरू आहे. पालिका, सरकारी अशी 59 लसीकरण केंद्रे तर खासगी रुग्णालयात 73 अशी एकूण 132 लसीकरण केंद्रांवर लसीकरण केले जाते.

Crowds of citizens at vaccination centers in Mumbai
मुंबई कोरोना लसीकरण

By

Published : Apr 26, 2021, 11:37 AM IST

मुंबई -मुंबईत कोरोना लसीकरण मोठ्या संख्येने होत आहे. यामुळे लसीचा वारंवार तुटवडा जाणवत आहे. गेले तीन ते चार दिवस लसीचा तुटवडा असल्याने बहुतेक लसीकरण केंद्र बंद होती. कालच पालिकेकडे दीड लाख लसीचा साठा आल्याने सोमवार 26 ते बुधवार 28 एप्रिल असे किमान तीन दिवस लसीकरण होऊ शकते, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. यामुळे लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी सकाळ पासून रांगा लागल्या आहेत.

लसीचा तुटवडा -

मुंबईत कोरोनाचा प्रसार गेले वर्षभर आहे. हा प्रसार रोखण्यासाठी मुंबईत गेले तीन महिने लसीकरण सुरू आहे. पालिका, सरकारी अशी 59 लसीकरण केंद्रे तर खासगी रुग्णालयात 73 अशी एकूण 132 लसीकरण केंद्रांवर लसीकरण केले जाते. आतापर्यंत 22 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मुंबईत दिवसाला 30 ते 50 हजार लसीकरण केले जात आहे. त्या प्रमाणात लसीचा साठा कमी मिळत असल्याने लसीचा तुटवडा जाणवत असल्याने अडचणी येत आहेत. लसीचा साठा मर्यादित स्वरुपात प्राप्त होत असल्याने अधूनमधून काही केंद्रांवर लसीकरण तात्पुरते थांबवावे लागते. त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देणे क्रमप्राप्त असल्याने लसींचा प्राप्त होणारा साठा लक्षात घेवून दररोज लसीकरण मोहिमेचे नियोजन केले जात आहे.

तीन दिवस लसीकरण सुरू राहणार -

महापालिकेला काल कोविशिल्ड लसीच्या 1 लाख 50 हजार तर कोव्हॅक्सिन लसीच्या 8 हजार अशा एकूण 1 लाख 58 हजार लसी प्राप्त झाल्या आहेत. मुंबईतील महानगरपालिका, शासकीय आणि खासगी अशा सर्व लसीकरण केंद्रांना कांजूरमार्ग येथूनच, त्यांची सरासरी दैनंदिन आवश्यकता लक्षात घेऊन लस साठा वितरण सुरू करण्यात आले आहे. लसीचा साठा आल्याने सोमवार 26 ते बुधवार 28 एप्रिल असे किमान तीन दिवस लसीकरण करता येणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

लसीकरणाला गर्दी -

मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सोमवार ते शुक्रवार मुंबईत सुमारे 40 ते 50 हजार लसीकरण होत आहे. तर शनिवार रविवारी 25 ते 35 हजारादरम्यान लसीकरण होते. मुंबईत आतापर्यंत एकूण 22 लाख 37 हजार 283 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. मोठ्या संख्येने लसीकरण होत असल्याने वारंवार लसीचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे लसीचा साठा आल्याची माहिती मिळताच नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर लसीकरणाला गर्दी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details