सातारा- कोरोना संदर्भात रुग्णांचा अहवाल लवकरात लवकर मिळावा यासाठी साताऱ्यातील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोविड चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात विकास कामांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोनाबाधित रुग्णाला तात्काळ आरोग्य सेवा मिळण्यासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर तसेच इत्यादी सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूरी देण्यात आलेली होती, परंतु आजपर्यंत या महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न सुटलेला नाही. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी मंत्रालयाकडे पाठवलेले 3 प्रस्ताव दाखवले आहेत. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जागेसंदर्भात बैठक घेण्यात येणार असून पुढील 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून या शासकीय महाविद्यालयाला उभारण्याच्या कामास गती देण्यात येईल.