मुंबई - कोविड-19 रुग्णासंदर्भातील माहिती विविध जिल्ह्यातील रुग्णालयांमधून पोर्टलवर भरण्यात येते. राज्य शासन या माहितीची स्वत:हून फेरतपासणी करून समायोजन केलेली माहिती पोर्टलवर सार्वजनिक करते. त्यामुळे आकडेवारीत वाढ दिसली तरी हेतूबाबत शंका घेण्याचे कारण नाही, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये फेरफार होत असल्याचा आरोप सोमवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला होता.
कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नोंदी कमी संख्येने दाखविण्यात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. याबाबत राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की, जागतिक आरोग्य संघटना आयसीएमआर तसेच नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) यांनी ठरवून दिलेल्या ICD-10 मार्गदर्शक तत्वांनुसार कोविड बाधित मृत्यू प्रकरणांची कार्यवाही केली जाते. त्यांचे पालन करणे बंधनकारक आहे. तसेच राज्य शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे मार्च 2020 पासून कोविड-19 प्रकरणाची पडताळणी करण्यात येत असून त्यानुसार समायोजन करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आलेली आहे. ११ जूनला राज्य शासनाने जिल्हा यंत्रणांना समायोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
राज्यात कालपर्यंत (१५ जून) 1 लाख 10 हजार 744 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण असून त्यापैकी 50 हजार 554 हे ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 4 हजार 128 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 56 हजार 049 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. परंतु राज्य शासनाने या माहितीमध्ये फेरतपासणी करुन मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आणखी 862 मृत्यू आढळून आले असून राज्यात 466 मृत्यू आढळले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये मृत्यू समयी कोविड अहवाल पॉझिटीव्ह आला होता आणि या सर्व प्रकरणांची नोंद डेथ इन कोविड पॉझिटीव्ह म्हणून घेण्यात आली आहे.
फेरतपासणीमध्ये राज्यात पुढीलप्रमाणे मृत्यू संख्या आढळली. अहमदनगर 1, अकोला 14, अमरावती 6, औरंगाबाद 33, बुलढाणा 2, धुळे 12, जळगाव 34, जालना 4, लातूर 3, नांदेड 2, नाशिक 28, उस्मानाबाद 3, पालघर 11, परभणी 1, पुणे 85, रायगड 14, रत्नागिरी 1, सांगली 4, सातारा 6, सिंधुदूर्ग 3, सोलापूर 51, ठाणे 146, वाशिम 1, यवतमाळ 1 अशी एकूण 466 कोविड बाधित मृत्युची संख्या आढळून आली आहे. त्याबाबतचे विश्लेषण दैनंदिन आरोग्य वार्तापत्रांतून देखील पारदर्शकपणे प्रसिद्ध करण्यात येत आहे. जन्म - मृत्यू नोंदणी कायदा 1969 च्या तरतुदीनुसार मृत्यू प्रमाणपत्रामध्ये उचित नोंद घेऊन प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत असल्याचेही मेहता यांनी यावेळी सांगितले.