मुंबई - मुंबईमधील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना न करता पश्चिम उपनगरात जाता यावे म्हणून कोस्टल रोड प्रकल्प उभारला जात आहे. हा प्रकल्प मुंबई महापालिका आणि पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी दोन बोगदे खणले जाणार असून त्यापैकी ३३० मीटर बोगद्याचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
महापौरांनी घेतला आढावा -
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार, जी/ दक्षिण विभागाचे प्रभाग समिती अध्यक्ष दत्ता नरवणकर यांच्या मागणीनुसार, महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी आज कोस्टल रोडच्या संपूर्ण कामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी महापौरांनी लोटसजेट्टी, हाजीअली जंक्शन, महालक्ष्मी मंदिरामागील परिसर, अमरसन्सचा परिसर या संपूर्ण कोस्टल रोडच्या मार्गाची संबंधित महापालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.
या पाहणी दरम्यान, महापौरांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून त्याचे काम कशा पद्धतीने सुरू आहे ते पाहणे तसेच दिलेल्या निर्धारित वेळेत काम पूर्ण होत आहे की नाही ? याची माहिती घेणे ही आमची जबाबदारी असल्याचे महापौरांनी सांगितले. तसेच महालक्ष्मी मंदिर परिसरातील रहिवाशांनी त्यांच्या परिसरातील रस्त्याच्या समतोलाबाबत शंका उपस्थित केली होती. त्यानुसार आज पाहणी केली असल्याचे महापौरांनी सांगितले.
कोस्टल रोडच्या कामाची महापौरांकडून पाहणी ३३० मीटर बोगद्याचे काम पूर्ण -
कोस्टल रोडच्या कामामध्ये २ किलो मीटरचे दोन बोगदे खणले जाणार आहेत. हे बोगदे खणण्यासाठी मावळा या टीबीएम मशीनचा वापर केला जात आहे. टीबीएम ‘मावळ’ मशीन प्रगतीचे एक एक टप्पे सर करीत असून, मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या ३३० मीटर बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. कोविड तसेच लॉकडाऊनच्या काळातही कोस्टल रोडचे काम वेगाने सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले.