ठाणे- कोरोनामुळे देशातील रुग्णांची संख्या वाढत असताना दिलासादायक वृत्त आहे. कोरोना झालेल्या एका कुटुंबातील तीन वर्षांच्या चिमुकलीने रोगावर मात केली आहे. कल्याण-डोबिंवली महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव झालेले एकूण ५ रुग्ण आढळून आले आहेत. त्या सर्वांना कस्तुरबा रुग्णालय दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. त्या कुटुंबामधील चिमुकली ही ठणठणीत बरी झाली आहे.
चिमुकलीसह एका रुग्णाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिका वैद्यकिय आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर कोरोना विषाणूचे संसर्ग झालेले रुग्ण असलेल्या परिसरात नियोजनाप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली आरोग्य पथके स्थापन करण्यात आली आहेत.
विदेशामधून घरी आलेल्या नागरिकांना घरातच विलगीकरणाचा सल्ला-
सध्या जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने राज्यात अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातही कोरोना आजाराच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका नागरी आरोग्य केंद्रामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. पालिका हद्दीतील प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रात आरोग्य पथके स्थापन केली आहेत. त्यात पोलीस कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. हे पथक विदेशामधून आलेल्या नागरिकांना भेटी देऊन त्यांच्या स्वतः च्या घरी विलगीकरणात राहण्याचा सल्ला देत आहेत. तर यामध्ये सहकार्य न करणाऱ्या नागरिकांवर साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
महापालिकेच्यावतीने क्वारंटाईन वॉर्डमध्ये २२ मार्चपासून विदेशामधून आलेल्या ९ नागरिकांना वेगळे ठेवण्यात आले आहे. त्यांची सर्व व्यवस्था महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. तर बुधवारी पालिका हद्दीतील मांडा-टिटवाळा शहरातदेखील विदेशातून आलेले सुमारे २१ संशयित नागरिकांना घरातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर पालिकेच्या विशेष पथकाचे लक्ष आहे.
खासगी रुग्णालयांनी विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचे आदेश-