मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकात नथूरामची भूमिका साकारल्यानंतर शरद पोंक्षे हे नाव अधिक परिचीत झाले. हे नाटक प्रदिप दळवी यांनी लिहिले होते. १९८९ मध्ये या नाटकाच्या प्रयोगाला शासनाने परवानगी दिली नव्हती. मात्र हे नाटक १९९७ मध्ये स्टोजवर आले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र केवळ १३ शोनंतर हे नाटक पुन्हा बंद पडले होते. दरम्यान अनेक कोर्टाच्या वाऱ्या केल्यानंतर २०११ मध्ये हे नाटक पुन्हा जोमाने सुरू झाले. शरद पोंक्षेनी यात मुख्य भूमिका साकारली आणि ते टीकेचे धनीही झाले. सुमारे ८१८ हून अधिक प्रयोगानंतर हे नाटक बंद करण्यात आले.
पोंक्षे सावरकरांच्या विचारसरणीने भारावलेले होते. या नाटकाचे पुनर्जीवन करण्याचा त्यांनी मनाशी पक्के ठरवले होते. त्यांनी 'हे राम , नथूराम' हे नवे नाटक स्वतः लिहिले आणि त्याचे प्रयोगही सुरू केले. नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग नाशिकमध्ये ५ ऑक्टोबर, २०१६ रोजी झाला. विरोध करणारे तर होतेच. त्यांनी नेहमी प्रमाणे विरोध केला, तरीही हे नाटक अजूनही सुरू आहे.
शरद पोंक्षे यांनी आपली भूमिका वारंवार प्रसार मध्यमातून मांडत नाटकाचे समर्थन केलंय. अलिकडे कमल हासन यांनी गोडसेबद्दल केलेल्या वक्तव्यांनंतर त्यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका होत आहे. अशात आता शरद पोक्षेंनीही कमल हासन यांच्यावर निशाणा साधला आहे. हिंदूं सहिष्णूवादी आहेत म्हणूनच असलं वक्तव्य खपवून घेतलं जात असं पोंक्षेंनी म्हटलं आहे. गेल्या काही वर्षात पोंक्षेंवर टीका करणारे आणि समर्थन करणारे यांच्यात नेहमीच वाद होत असतात. दरम्यान वेगवेगळ्या प्रसंगी पोंक्षेंनी केलेली विधाने चर्चेत राहिली आहेत आणि वादग्रस्तही ठरली आहेत.