रायगड- मुंबई गोवा महमार्गाच्या पहिल्या टप्यातील पेण वडखळ रस्त्याचे काम हे 9 वर्षांपासून अद्याप रखडले आहे. या खड्डेमय रस्त्यावर भर पावसात डांबर मारण्याची अजब कल्पना ठेकेदाराने अवलंबली आहे. त्यामुळे आधीच रखडलेल्या महामार्गाच्या कामात ठेकेदाराकडून भर पावसात डांबर टाकून 'तुक' लावण्याचे काम केले जात असल्याने या कामात वाटमारी केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्यातील कामाला 2011 पासून सुरुवात झाली. पळस्पे ते इंदापूर हा पहिला टप्पा असून काही प्रमाणात या रस्त्याचे काम झालेले आहे. मात्र पेण ते वडखळ या रस्त्याचे काम आजही धिम्या गतीने ठेकेदाराकडून सुरू आहे. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की पेण वडखळ रस्ता हा खड्डेमय झालेला असतो. मग त्यावर तुकपट्टी करून तात्पुरती मलमपट्टी ठेकेदार आणि नॅशनल हायवे अधिकाऱ्यांकडून केली जाते. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेहमी खड्डेमय रस्त्यानेच प्रवास करावा लागत आहे.