रत्नागिरी - काँग्रेस नेते राहुल गांधीसोबत झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाचा देशभरात काँग्रेसकडून निषेध करण्यात येत आहे. चिपळूणमध्येही तालुका कॉंग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ज्या पोलिसांनी आमच्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की केली, त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे. त्यांचे निलंबन झाले पाहिजे, अन्यथा आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशा कडक शब्दात प्रशांत यादव यांनी आपली प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला.
राहुल गांधींना धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा, चिपळूणमध्ये काँग्रेसचा आक्रमक पवित्रा
उत्तरप्रदेश प्रदेशमधील हाथरस येथे राहुल गांधी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची विचारपूस करण्यासाठी जात होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले आणि धक्काबुक्कीही केली. या प्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली असून त्यांना धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज चिपळूणमध्ये काँग्रेसच्या वतीने करणयात आली.
उत्तर प्रदेश प्रदेशमधील हाथरस येथे राहुल गांधी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची विचारपूस करण्यासाठी जात होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले, मात्र त्यानंतरही ते पायी चालत निघाले असतानाही त्यांना तेव्हाही त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आले. तसेच धक्काबुक्कीही करण्यात आली. राहुल गांधी पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात होते. यात उत्तर प्रदेश सरकारला, प्रशासनाला कसली भीती वाटली? असा प्रश्न प्रशांत यादव यांनी उपस्थित करत सरकारला जाब विचारला आहे.
यमुना एक्सप्रेस हायवेवर जे घडले ती दृश्ये आम्ही पाहिली, आमच्या नेत्यांच्या बाबतीत ज्या पद्धतीने तिथे पोलीस वागले, ही सारी दृश्ये धक्कादायक आहेत. आम्ही या साऱ्या घटनेचा जाहीर निषेध करतो, असे यादव यावेळी म्हणाले. ही अत्यंत निंदाजनक घटना आहे. राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आहेत, त्याचबरोबर ते संसदेचे सदस्य आहेत, याचे भान किमान पोलीस आणि तिथल्या प्रशासनाने ठेवायला हवे होते, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हायला हवी. तसेच हे करणाऱ्या पोलिसांचे निलंबन व्हायला हवे, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही, या घटनेला सडेतोड उत्तर देऊ, असा इशारा प्रशांत यादव यांनी दिला आहे.