महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

गांधी जयंती दिनी काँग्रेस रस्त्यावर, हाथरस प्रकरण सरकार दडपू पाहत असल्याचा केला आरोप - हाथरस अत्याचार प्रकरण

उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेलेल्या राहुल गांधी यांना धक्काबुकी करण्यात आली. या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र आणि योगी सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच तरुणीवर अत्याचार झाला असतानाही हे प्रकरण सरकार दडपू पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला.

उत्तर प्रदेशातील अत्याचार प्रकारणी काँग्रेसचे आंदोलन
उत्तर प्रदेशातील अत्याचार प्रकारणी काँग्रेसचे आंदोलन

By

Published : Oct 2, 2020, 6:22 PM IST

सिंधुदुर्ग - उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये अत्याचार झालेल्या युवतीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. तसेच पीडित युवतीवर पोलिसांनी रातोरात अंत्यसंस्कार केले. या घटनेच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तसेच केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कृषी विषयक विधेयकाचाही यावेळी निषेध करण्यात आला.

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून आज कणकवलीतील पटवर्धन चौकात काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी दोन्ही महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आली. तर, उत्तर प्रदेशमधील अत्याचार प्रकरण आणि राहुल गांधींना केलेल्या धक्काबुक्की प्रकरणी भाजपा सरकारचा विरोध करण्यात आला.

यावेळी कणकवली तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर म्हणाले, की भाजपा सरकार देशात दडपशाही राबवत असून, महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. त्या मुलीवर झालेला अत्याचार उघड होऊ नये यासाठी प्रशासनाने तिचा मृतदेह परस्पर जाळला असल्याचेही मांजरेकर म्हणाले. तरुणीवर अत्याचार झाला असतानाही हे प्रकरण सरकार दडपू पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे या पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला जात असताना त्यांना अत्यंत वाईट वागणूक देण्यात आली. या दोन्ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचे ते म्हणाले. योगी सरकार केंद्रातील नेत्यांची ही अवस्था करत असेल तर सामान्य माणसाची त्या ठिकाणी काय अवस्था असेल याचा विचार न केलेला बरा असेही मांजरेकर म्हणाले.

दरम्यान, यावेळी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कृषीविषयक विधेयकाचाही निषेध करण्यात आला. हे विधेयक शेतकरी विरोधी असून अंबानी आणि अदाणी सारख्या भांडवलदारांना फायदा करुन देण्यासाठी केंद्राने आणल्याचा आरोपही त्यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details