मुंबई- मास्क आणि सॅनिटायजरच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागाने नेमलेल्या 4 सदस्यीय समितीला 3 दिवसात अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि सॅनिटायजरचा वापर वाढला असून त्यांच्या किमती निश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत समिती गठीत करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री टोपे व अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार काल आरोग्य विभागाने शासन निर्णयाद्वारे समिती गठीत केली. राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे समितीचे अध्यक्ष असून हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक, राज्य औषध नियंत्रण प्राधिकारी सहआयुक्त हे सदस्य असून आरोग्य संचालक समितीचे सदस्य सचिव आहेत.