मुंबई- कोरोनाकाळात राज्याची अर्थव्यवस्था डळमळीत झाली असताना प्रलंबित महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कर्जमुक्तीसाठी पात्र असलेल्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ देण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. योजनेत ज्या पात्र शेतकऱ्याला कर्जमुक्ती योजनेचा लाभ देणे बाकी आहे त्यांना लाभ देण्याची प्रक्रिया गतिमानपद्धतीने राबविली जावी. जिल्हाधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी 21 हजार 437 कोटी रुपयांची आवश्यकता होती. त्यापैकी 17 हजार 646 कोटी रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेतून देण्यात आला आहे. योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी गावपातळीवर ग्रामपंचायतींमध्ये तसेच बँकांच्या शाखा स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापैकी 2019-20 या आर्थिक वर्षात जवळजवळ 19 लाख खातेदारांना 11 हजार 993 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला होता, तर 2020-21 या आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण 5 हजार 653 कोटी रुपयांची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे.