मुंबई - राम मंदिर भूमिपूजन सोहोळ्यासाठी इतक्या वर्षांपासून जे रामभक्त वाट पाहत आहेत, ज्यांची या सोहळ्याला उपस्थित राहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, ज्यांच्यासाठी हा सर्वोच्च आनंदोत्सव आहे, त्या लाखो रामभक्तांचे काय करणार? त्यांच्या भावनेचे काय करणार, राम मंदिराचे ई-भूमिपूजन करू शकत नाहीत का? असा परखड सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला केला.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली होती. त्यात राऊत यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्द्याला हात घालत मुख्यमंत्री ठाकरे यांना प्रश्न केले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी परखड मत व्यक्त करत राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्द्यावरील मौन सोडले आहे.
राम मंदिराच्या भूमिपूजनाला जाणार की नाही? एक व्यक्ती म्हणून हो की नाही, हे मी काहीही सांगेल. मी मुख्यमंत्री आहे, पूर्ण सुरक्षेत मी व्यवस्थित जाऊन येईलही. मुद्दा तो नाही. एखाद्या गावात मंदिर बांधायचे असेल तर मोठा जल्लोष केला जातो. नागरिक मंदिर निर्माणाच्या कार्यात भाग घेतात. उत्सुकता असते. चैतन्य सळसळते. अयोध्येतील राम मंदिर हे काही सर्वसामान्य मंदिर नाही. या मंदिराला लढ्याची पार्श्वभूमी आहे. हा जागतिक कुतूहलचा विषयही आहे. रामभक्तांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. अनेक वर्षांपासून ते या क्षणाची वाट पाहत आहेत, त्यांच्या भावनांचे काय करणार, असा सवाल मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला आहे.
तसेच, कोरोनामुळे आपण नागरिकांना मंदिरात जाण्यास बंदी घातली आहे. त्यात आता तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही भूमिपूजन करू शकता, ई-भूमिपूजनही करू शकता, असेही उद्धव ठाकरे यांनी सुचवले.