महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

लग्न समारंभामध्ये गर्दी जमवणे नवरदेवाला पडले महाग, गुन्हा दाखल - पालघर लग्न समारंभ बातमी

जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे सामाजिक, सांस्कृतीक कार्यक्रमांमध्ये गर्दी न करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मात्र, मोखाडा तालुक्यातील मौजे साखरी येथील एका लॅब तंत्रज्ञाने विवाह सोहळा आयोजित करत ७०-८० लोकांना बोलावून कोरोनाचा प्रसार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.

मनाई आदेशाचा भंग करून लग्न समारंभ आयोजित केल्यामुळे गुन्हा दाखल
मनाई आदेशाचा भंग करून लग्न समारंभ आयोजित केल्यामुळे गुन्हा दाखल

By

Published : Jun 18, 2020, 5:17 PM IST

पालघर - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशसनाच्यावतीने नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. मात्र, या आदेशाचा भंग करून मोखाडा तालुक्यातील मौजे साखरी येथील लॅब तंत्रज्ञ याने विवाह सोहळा आयोजित करून कोरोनाचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.

मोखाडा तालुक्यामधील मौजे - साखरी येथील पोलीस पाटील हिरु पाटील राहणार साखरी यांनी १६ जूनला पोलीस ठाणे अंमलदार, पोलीस ठाणे मोखाडा यांचे समक्ष जव्हार येथील सदानंद रुग्णालय येथील लॅब तंत्रज्ञ रा. साखरी याच्याविरुध्द तक्रार दिली. सदर व्यक्तीचा केळघर येथील एका मुलीबरोबर ११ जूनला लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. १० जूनला सायंकाळी ६.०० दरम्यान सदर लॅब तंत्रज्ञ याच्या घरी हळदीच्या समारंभामध्ये ७०-८० लोक सहभागी झाले होते.

याप्रकरणी मौजे - साखरी गावचे पोलीस पाटील यांनी लॅब तंत्रज्ञ यास सदर कार्यक्रमाची तहसिलदार किंवा पोलीस ठाणे यांचेकडून लेखी परवानगी घेतली आहे का, अशी विचारणा केली. मात्र, त्याने कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे निदर्शनास आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. सध्या जिल्ह्यामध्ये तसेच तालुक्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असून राज्य साथरोग प्रतिबंधक कायदा १८, ९, ७ हा १३ मार्चपासून लागू करून खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. मात्र, संबंधित लॅब तंत्रज्ञाने व कार्यक्रमामध्ये सहभागी असलेल्या लोकांनी मास्क न वापरणे, गर्दी करणे व सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही पालन न केल्याचे निदर्शनास आले असल्याचे नमूद केले आहे. सदर बाबींमुळे साखरी गावात व मोखाडा तालुक्यामध्ये मोठया प्रमाणावर कोरोना विषाणूच्या संसर्गाची भीती निर्माण झाली असून सदर व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केले आहे. सदर लॅब तंत्रज्ञाने स्वत:च्या लग्नात ७०-८० लोकांचा जमाव करून शासनाने ठरवून दिलेल्या कोणत्याही प्रकारचे नियम न पाळता आदेशाचा भंग केला. त्यामुळे, या लॅब तंत्रज्ञाविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात 17 जूनला सायंकाळी 6 पर्यंत मोखाडा 9 व जव्हार येथे 39 कोरोनाबाधित रुग्णाची नोंद आहे. आज(गुरुवार) दिवसभरात पालघर जिल्ह्यात वसई विरार महानगरपालिकेसह एकूण 2 हजार 285 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून 75 जणांचा मृत्यू झाला आहे.

पालघर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी

वाडा तालुका -117,डहाणू तालुका - 58, विक्रमगड - 62, वसई ग्रामीण - 78, पालघर तालुका - 153, तलासरी - 8 आणि वसई विरार महानगरपालिका - 1761 असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details