गोंदिया - उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी केलेल्या कारवाईत 1 कोटी 16 लाख 80 हजार 650 रुपयांचा दंड ठोठावल्यामुळे अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. रेती तसेच इतर गौण खनिजांचे अवैध उत्खनन आणि त्याची वाहतूक रोखण्यासाठी गोंदिया तालुक्यात पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाकडून अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करून त्याची वाहतूक करणाऱ्यांविरोधात नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
महालगाव येथील वैनगंगा नदीच्या पात्रातून रवी बंभारे (रा. धापेवाडा) आणि अब्दुल इफतेखार जब्बार गणी (रा. लक्ष्मीनगर गोंदिया) यांच्यावर याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर रेतीचे उत्खनन आणि वाहतूक प्रकरणी पथकाने टिप्पर, जेसीबी जप्त करून कारवाई केली. त्यांच्याविरोधात 1 कोटी 14 लाख 33 हजार 550 रुपये दंड आकारण्यात आला. या प्रकरणी गोंदिया उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते आणि तत्कालीन तहसीलदार तथा सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता नदीपात्रातील दोन्ही ठिकाणावरून रेतीचा अवैध उपसा केल्याचे आढळून आले.