रायगड - कोरोनाच्या महाभयानक संकटात बहुसंख्य जण कोणत्या ना कोणत्या मार्गाने समाजाची मदत करीत आहेत. तर दुसरीकडे काही समाजकंटक मात्र या संकटातही आर्थिक लाभासाठी रेमडेसिवीर सारख्या इंजेक्शनचा काळाबाजार करण्यात गुंतले आहेत. रेमडेसिवीरचा काळाबाजार करत एक इंजेक्शन 50 हजार रुपयांत विकणारी खोपोलीतील तीन जणांच्या टोळीला नारायणराव पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी रात्री खोपोलीत करण्यात आली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत नारायणराव पोलीस पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बाधित रुग्णाच्या नातेवाईकांची या रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी असल्याने त्याने आपल्या नातेवाईकांचा जीव वाचविण्यासाठी या खोपोलीतील टोळीकडे संपर्क केला. यानंतर हे इंजेक्शन 50 हजाराला विकत घेतले, अशी माहिती नारायणगाव पोलिसांना मिळाली होती. यानंतर नारायणराव पोलिसांनी या संदर्भात सखोल चौकशी केली. त्यानुसार नारायणगाव पोलिसांनी पुढील तपास सुरू केल्यावर खोपोलीतील हे त्रिकुट रेमडीसिविरचा काळा बाजार करीत असल्याचे स्पष्ट झाल्यावर खोपोली पोलिसांना विश्वासात घेऊन गुरुवारी रात्री खोपोलीतील या तिघांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली.
अटक करण्यात आलेल्या तिघांवर खोपोलीतील शासनमान्य दोन खासगी कोविड रुग्णालयासहित खोपोली बाहेरही रेमडेसिवीरचा काळाबाजार व तस्करी करण्याचा आरोप आहे. ही टोळी एक रेमडेसिवीरचे इंजेक्शन पन्नास हजार रुपयात विकत असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. आरोपींमध्ये खोपोलीतील एक मोठा स्टील, सिमेंट व्यापारी, एक नगरपालिका आरोग्य विभागातील कर्मचारी व एक राजकीय पक्ष कार्यकर्त्याचा समावेश आहे. या प्रकाराने खोपोलीत मोठी खळबळ उडाली आहे. सर्वत्र तीव्र संताप व निषेध व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी मिळालेल्या माहितीनुसार या तिघांना नारायणगाव न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यासंदर्भात पुढील तपास नारायणगाव पोलीस करीत असून खोपोली पोलीस ही या तपास कामी पूर्ण सहकार्य करीत आहे.
खोपोली शहरात शासनाकडून दोन खासगी रुग्णालयांना परवानगी मिळाली असल्याने या ठिकाणी रुग्णांना रेमडेसिवीर या इंजेक्शनची गरज भासत असल्याने त्यानुसार शासनाच्या परवानगीनुसार मागणीप्रमाणे इंजेक्शन मंजूर करून पाठवले जातात. मात्र, खोपोली शहरात या तीन जणांच्या टोळीने नक्की हे इंजक्शन कुठून उपलब्ध केले आणि बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये 1000-1200 रुपये किंमतीचे इंजेक्शन तब्बल 50 हजाराला विक्री करीत होते. याबाबत मोठी चर्चा सुरू आहे.