जयपूर - मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बुधवारी उशिरा भाजप राजस्थानात घोडेबाजार करत असल्याचा आरोप केला. सरकार अस्थिर करण्यासाठी येथे भाजप मध्यप्रदेशात खेळलेला खेळ राजस्थानातही खेळत आहे, असे ते म्हणाले.
‘आमच्या आमदारांना 25 कोटींची ऑफर देण्यात आली. यापैकी 10 कोटी सुरुवातीला आणि उरलेले 15 कोटी काम झाल्यानंतर दिले जातील, असे या आमदारांना सांगण्यात आले. मात्र, या आमदारांनी लगेच आम्हाला कळवले. सध्या दिल्लीहून जयपूरला मोठ्या प्रमाणात पैसे आणले जात असल्याची माहिती आम्हाला अन्वेषण संस्थांकडून मिळाली आहे,’ असे मुख्यमंत्री गेहलोत यांनी सांगितले. याची माहिती त्यांनी शिव-विलास रिसॉर्टबाहेर आल्यानंतर दिली. येथे काँग्रेस आणि अपक्ष मिळून एकूण 90 आमदार काल संध्याकाळपासून ठेवण्यात आले आहेत. सुरुवातीला आमदारांना पैशाच्या जाळ्यात अडकवले जाण्याच्या भीतीने या रिसॉर्टवर ठेवण्यात आले होते. मात्र, रात्री उशिरा त्यांना घरी पाठवण्यात आले. यादरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत यांच्यासोबत बैठक करण्यात आली.
काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार के. सी. वेणुगोपाल जयपूरला येणार असल्याने गुरुवारी पुन्हा पक्षाचे कार्यकर्ते आणि अपक्षांची बैठक घेतली जाईल, अशी माहिती गेहलोत त्यांनी दिली. तसेच, आमच्या राज्याचे आमदार विकले गेले नाहीत, याबद्दल मला त्यांचा अभिमान आहे असे ते म्हणाले.