पुणे- क्वारंटाईन सेंटरमध्येही महिला सुरक्षित नाहीत. राज्यात आतापर्यंत महिला अत्याचाराच्या चार घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित महिलांनी उपचारासाठी रुग्णालयात जायचे की नाही याचे उत्तर सरकारने द्यावे. आतापर्यंत ज्या ठिकाणी या घटना घडल्या त्यातील आरोपींना शिक्षा तर झालीच पाहिजे. पण ते सेंटर सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्यावरही कारवाई का करण्यात येऊ नये, असा सवाल भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.
क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांना सुरक्षा द्या, चित्रा वाघ यांची सरकारला मागणी - Chitra wagh on quarantine centre
प्रत्येक क्वारंटाईन सेंटरमध्ये महिला सुरक्षारक्षक बंधनकारक करा. महिलेला कुठल्याही क्वारंटाईन सेंटरमध्ये एकटे ठेवण्यात येऊ नये. पोलिसांनाही पीपीई किट देण्यात यावे. प्रत्येक क्वारंटाईन सेंटरमध्ये 2 ते 3 पोलीस पीपीई किट घालून तैनात करण्यात यावेत, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये एका महिलेचा विनयभंग करण्यात आला होता. हा संपूर्ण प्रकार घडत असताना या महिलेने पोलिसांच्या 100 क्रमांकावर देखील फोन करत मदतीची मागणी केली होती. पण, पोलिसांनी पीपीई किट नसल्याचे कारण देत मदत करण्यासाठी असमर्थता दर्शवली. मग महिला सुरक्षित कशा राहणार? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. त्यामुळे प्रत्येक क्वारंटाईन सेंटरमध्ये महिला सुरक्षारक्षक बंधनकारक करा. महिलेला कुठल्याही क्वारंटाईन सेंटरमध्ये एकटे ठेवण्यात येऊ नये. पोलिसांनाही पीपीई किट देण्यात यावे. प्रत्येक क्वारंटाईन सेंटरमध्ये 2 ते 3 पोलीस पीपीई किट घालून तैनात करण्यात यावेत, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.