महाराष्ट्र

maharashtra

महापौरांच्या दालनात भाजपा नगरसेविकेच्या पतीसोबत पदाधिकाऱ्याची जुंपली,पैशावरून झाला वाद

By

Published : Oct 8, 2020, 8:14 PM IST

भाजपा नगरसेविका ज्योती चव्हाण यांचे पती तथा महापालिकेतील कर्मचारी बाळासाहेब चव्हाण आणि भाजपचे महानगर कार्यकारिणीचे पदाधिकारी भूपेश कुळकर्णी यांच्यात आज महापौर दालनातच जोरदार बाचाबाची झाली. पैसे देण्यावरून हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

Bjp corporator' husband Quarrel with bjp incumbent in satara
Bjp corporator' husband Quarrel with bjp incumbent in satara

जळगाव - भाजपा नगरसेविकेचा पती आणि भाजपा पदाधिकाऱ्याची महापौरांच्या दालनात आज चकमक उडाली. पैशांच्या वादातून हा प्रकार घडला असून, यावेळी दोघांनी एकमेकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत एकमेकांवर दालनातील खुर्च्याही उगारल्या. यामुळे दालनात काही काळ तणाव निर्माण झाला होता. महापौरांच्या स्वीय सहाय्यकांनी मध्यस्थी करत दोघांना दूर केल्यानंतर हा वाद मिटला.

आज महापालिकेत प्रभाग समिती सभापती पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. ही प्रक्रिया आटोपल्यानंतर काही नगरसेवक व नगरसेविका हे स्थायी सभापती यांच्या दालनात बसलेले होते. त्यावेळी भाजपा नगरसेविका ज्योती चव्हाण यांचे पती तथा महापालिकेतील कर्मचारी बाळासाहेब चव्हाण व भाजपाचे महानगर कार्यकारिणीचे पदाधिकारी भूपेश कुळकर्णी यांच्यात महापौर दालनातच जोरदार बाचाबाची झाली. पैसे देण्यावरून हा वाद झाल्याची माहिती आहे.

याबाबत अधिक माहिती देताना भूपेश कुळकर्णी यांनी सांगितले की, महापालिकेत महापौर यांच्या दालनाबाहेर आपण थांबलेलो असतानाच महापालिका कर्मचारी बाळासाहेब चव्हाण जवळ आले. त्यांनी 'तू माझ्या वॉर्डात काम करतो, त्या कामाचा हिशोब करुन पैसे दिले नाही', असे म्हणत वाद घालायला सुरुवात केली.

पैशांच्या विषयावर बोलण्याची ही जागा नसल्याचे सांगत, त्यांना समजवले तरी देखील त्यांनी मला शिवीगाळ केल्याने आमचा वाद झाला. त्यानंतर महापौरांच्या दालनात देखील त्यांनी पैशांची मागणी करत शिवीगाळ सुरुच ठेवली. तसेच दालनातील खुर्ची माझ्यावर उगारुन माझ्या अंगावर धावून आले, असा आरोप कुळकर्णी यांनी केला.

याबाबत बाळासाहेब चव्हाण यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी माझा कुणाशीच वाद झाला नसल्याचा दावा केला. तसेच मला या विषयावर काहीच बोलायचे नाही, असे सांगत अधिक बोलणे टाळले. दरम्यान, याबाबत महापौर भारती सोनवणे यांना विचारले असता, हा प्रकार घडला, त्यावेळी मी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासोबत महापालिकेच्या कोविड सेंटरची पाहणी व रुग्णांच्या भेटी घेण्यासाठी गेले होते. त्यामुळे नेमके दालनात काय झाले ते माहिती नसल्याचे महापौर सोनवणे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details