अकोला- जिल्ह्यात केवळ 17 टक्के शेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्ज दिले आहे. राज्य सरकारची कर्ज माफी फसवी असून दोन्ही टप्प्यांपैकी जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांसह राज्य सरकार संचालित असलेल्या बँकांनी केवल 40 टक्के शेतकऱ्यांनाच खरीप पिकासाठी कर्ज पुरवठा केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याने आज जिल्ह्यातील 10 हजार भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रतिकात्मक आंदोलन केले आहे.
जर 8 दिवसात शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा खरमरीत इशारा जिल्हा भाजप अध्यक्ष व आमदार रणधीर सावरकर यांनी दिला आहे. तसेच, शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे येऊन सुद्धा त्यांना देण्यात येत नाहीत. 6 महिन्यापासून शेतकऱ्यांवर अन्याय सुरू आहे. वारंवार या संदर्भात सूचना दिल्यावर सुद्धा राज्य सरकार आदेश देत नाही. हा प्रकार निंदनीय आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आश्वासन देणारे आघाडी सरकार शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करत आहे, अशी माहिती आमदार सावरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.