मुंबई -कोरोनाचे रुग्ण वाढत असताना पालिका, राज्य सरकार आणि खासगी लॅबकडून कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. मात्र, या चाचण्यांचा अहवाल खासगी लॅबकडून उशिरा दिला जात असल्याने पालिकेकडून या लॅबवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार पालिकेने मेट्रोपोलीस या प्रतिष्ठित लॅबवर कारवाई करत चार आठवड्याची बंदी घातली आहे. तर, चुकीचा अहवाल देणाऱ्या थायरोकेअर लॅबवरही कारवाई करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
कोरोना टेस्ट अहवाल उशिरा देणाऱ्या मेट्रोपोलिस लॅबवर बंदी, थायरोकेअरवरही लवकरच कारवाई
मुंबईमध्ये रोज चार ते पाच हजार कोरोनाच्या टेस्ट केल्या जात आहेत. मुंबईमधील 7 सरकारी व पालिकेच्या 7 तसेच 13 खासगी लॅबद्वारे या टेस्ट केल्या जात आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून काही खासगी लॅबकडून टेस्टचे अहवाल द्यायला 17 ते 18 दिवसांचा कालावधी लागत होता. अशा लॅबवर कारवाई करण्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिला होता.
मुंबईमध्ये रोज चार ते पाच हजार कोरोनाच्या टेस्ट केल्या जात आहेत. मुंबईमधील 7 सरकारी व पालिकेच्या 7 तसेच 13 खासगी लॅबद्वारे या टेस्ट केल्या जात आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून काही खासगी लॅबकडून टेस्टचे अहवाल द्यायला 17 ते 18 दिवसांचा कालावधी लागत होता. अशा लॅबवर कारवाई करण्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिला होता. तसेच, अहवाल लवकर द्यावेत, असे खासगी लॅबना सांगण्यात आले होते. मात्र, त्यांतरही काही लॅबकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले. यामुळे पालिका आयुक्तांनी अशा लॅबवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मेट्रोपोलीस या खासगी लॅबपासून कारवाई सुरू झाली आहे. मेट्रोपोलीस लॅबला कोरोनाच्या चाचण्या करण्यापासून चार आठवड्याची बंदी घालण्यात आली आहे. बंदी घालण्यात आलेल्या मेट्रोपोलीस लॅबमध्ये दिवसाला सातशे ते आठशे टेस्ट रोज केल्या जात होत्या. त्या टेस्ट आता इतर लॅबकडून केल्या जाणार आहेत.
थायरोकेअरवरही विचार सुरू -
मेट्रोपोलिस लॅबवर कारवाई करण्यात आली असताना थायरोकेअर लॅबवरही विचार सुरू असल्याची माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या लॅबमध्ये करण्यात येणाऱ्या बहुतेक टेस्टचा अहवाल चुकीचा येत असल्याची तक्रार आहे. ठाणे महानगरपालिकेने या लॅबवर बंदी घातली आहे. यामुळे आता मुंबई महापालिकेकडूनही या लॅबवर बंदी घातली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.