मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बकरी ईद साजरी करण्यासाठी कायदा व सुव्यवस्था आणि त्यासंदर्भातील उपायोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत बकरी ईद संदर्भात अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावा, अशी भूमिका राज्यातील मुस्लीम आमदार आणि मंत्र्यांनी घेतली. यामुळे उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात बकरी ईद साजरी करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध महानगरांमध्ये लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे तर लवकरच येत असलेल्या बकरी ईदच्या दरम्यान काही अटी आणि नियम लावून मुस्लीम समाजाला हा सण साजरा करताना कुर्बानी देण्याची सवलत सरकारकडून देण्यात यावी, अशी मागणी मुस्लीम आमदारांकडून मागील काही दिवसांपासून केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत मुस्लीम आमदारांनी यासंदर्भात सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी केली.