परभणी - आम्ही भाजपचे मोजकेच शिष्टमंडळ घेऊन शेतकऱ्यांच्या आणि परभणीत वारंवार लागू करण्यात येणाऱ्या संचारबंदीच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यामुळे आमच्यावर सोशल-डिस्टन्सिंगचे पालन न केल्या प्रकरणी आणि संचारबंदीच्या कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी शंभर-दीडशे लोकांचा ताफा आणला आणि काहीच नियम पाळले नाहीत. त्यांना परभणीच्या जिल्हा प्रशासनाने का सूट दिली ? असे सवाल माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांपुढे उपस्थित केले आहेत.
देशाचे कायदे व नियम पालकमंत्री आणि आमच्यासाठी सारखेच आहेत, मग आमच्यावरच गुन्हे का दाखल केले? असा सवाल माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केला आहे. जिल्ह्यातील बियाणे न उगवल्याच्या प्रश्नावर तसेच पीककर्ज व पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह वारंवार संचारबंदीच्या निर्णयाविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता 14 जुलै रोजी माजी मंत्री बबनराव लोणीकर आणि भाजपचे स्थानिक नेत्यांचे शिष्टमंडळ परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना भेटायले गेले होते. मात्र याठिकाणी त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही, तसेच संचारबंदीत मोठा जमाव सोबत आणला, या कारणाखाली त्यांच्यासह शिष्टमंडळातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
विशेष म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांच्या विरोधात निदर्शने करून आंदोलन केले होते. त्यांच्यावर देखील नवामोंढा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. परंतु याप्रकरणी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून परभणीच्या माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईबद्दल संताप व्यक्त केला. ते म्हणाले, 'आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांना मोजक्याच लोकांच्या शिष्टमंडळासह निवेदन देण्यासाठी गेलो होतो. लोकांचे प्रश्न मांडणे आवश्यक आहे. परभणीत वारंवार लागू करण्यात येणाऱ्या संचारबंदीमुळे सामान्यांची मोठी अडचण होत आहे. शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. शिवाय पीक कर्ज पीकविमा आणि बियाणे न उगवल्याच्या अनेक तक्रारी असून, त्या मांडणे आवश्यक होते. म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो होतो. मात्र त्यांनी आमच्यावरच गुन्हे दाखल केले असे लोणीकर म्हणाले.