कॅनबेरा - मागील काही दिवसांपासून चीनने शेजारील देशांशी आणि त्यांच्याच काही प्रदेशात आक्रमक धोरण स्वीकारले आहे. यातील एक उदाहरण म्हणजे हाँगकाँग. येथील लोकशाहीवादी व्यवस्था आणि चळवळ कमजोर करण्यासाठी चीनकडून कठोर कायदे लादण्यात येत आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियने हाँगकाँगसोबतचा प्रत्यार्पण करार रद्द केला आहे. त्यामुळे आता चीनने गुन्हेगार ठरवलेला हाँगकाँगमधील कोणताही व्यक्ती ऑस्ट्रेलियात राहत असेल तर त्याला चीनकडे सुपुर्द करण्यात येणार नाही.
राजधानी कॅनबेरा येथे पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिस यांनी ही माहिती दिली. चीनने हाँगकाँगमध्ये लागू केलेला राष्ट्रीय सुरक्षा कायद्यामुळे प्रत्यार्पण कायद्यासंदर्भातील परिस्थितीत मुलभूत बदल घडून आले आहेत. यासंबंधी हाँगकाँग आणि चीनला माहिती देण्यात आल्याचे मॉरिस यांनी सांगितले.