गडचिरोली- जिल्हातील भामरागड तालुक्यातील नारगुंडा येथून 5 कि.मी अंतरावरील कुच्चेर गावापर्यंत वीज पुरवठा नसल्याने गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत होता. या बाबतीत नारगुंडा पोलीस मदत केंद्र प्रभारी अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक किरण वाघ यांच्या पाठपुराव्याने व महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रभाकर मेश्राम यांच्या पुढकाराने 4 जुलैला गावात वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कित्येक वर्षे अंधारात काढणाऱ्या ग्रामस्थांना विजेचे दर्शन झाले. त्यामुळे गावकरी सुखावले आहे.
या वेळी वीज ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन नारगुंडा पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके यांच्या हस्ते करण्यात आले. वेळी पोलीस उपनरीक्षक दयाराम वनवे, लाईनमन दाडे, विद्युत सहाय्यक शशिकांत ढोले, सुपरवायझर प्रफुल वाघाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही शासन प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे आजही भामरागड तालुक्यातील अनेक आदिवासी गावांमध्ये अंधार आहे. गावांमध्ये पक्के रस्ते, आरोग्य सेवा या मुलभूत गरजांचाही अभाव आहे. अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील कुच्चेर येथे जेमतेम 17 ते 18 घरे आहेत. दरम्यान, भामरागड पासून 16 कि.मी. अंतरावर असलेल्या नारगुंडा पर्यंत वीज पुरवठा सुरू आहे. फक्त 4 कि.मी अंतरावर असलेल्या कुच्चेर गावात वीज पुरवठा नव्हता. प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणाला हे गाव बळी पडले होते.
गावातील नागरिकांनी मागील अनेक वर्षांपासून वीज पुरवठा सुरू करण्यासाठी मागणी केली. 10 वर्षापूर्वी कुच्चेर गावासमोरील खंडी नैनवाडी पर्यंत वीज खांब तार जोडण्यात आले होते. मात्र, वीज जोडणी झाली नाही. याबाबतीत नारगुंडा पोलिसांकडून जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यांनी जिल्हाधिकारी व वीज वितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून कुच्चेर गावात वीज पुरवठा सुरू करण्यासाठी कार्य सुरू केले. त्यानंतर दोन वर्षाआधी खांब उभे करून तार टाकण्यात आले. तसेच एक वर्षाआधी प्रत्येकाच्या घरी वीज मीटरसुध्दा बसविण्यात आले. मात्र विज पुरवठाच करण्यात आलेला नव्हता.
याबाबत अनेकदा महावितरण कार्यालयात माहिती देण्यात आली. ग्रामसभेमार्फत निवेदन देण्यात आले. मात्र काही एक फायदा झाला नाही. अनेकदा विनवणी करूनही महावितरणकडून कुच्चेर गावाच्या विजप्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेवटी, आम्ही असेच अंधारमय जीवन जगावे काय, असा प्रश्न ग्रामस्थांनी पत्रकारांसमोर उपस्थित केला. याबाबत माध्यमात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर कार्यकारी अभियंता प्रभाकर मेश्राम यांनी भामरागडचे कनिष्ठ अभियंता पंकज तेली व त्यांचे सहकारी याना लगेच रखडलेले काम पूर्ण करून कुच्चेर गावातील विजपुरवठा एका आठवड्यात सुरळीत करण्याचे सांगितले. त्यांनतर, कुच्चेर गावात आता वीज पुरवठा सुरू झाला आहे. याबाबत, महावितरणचे तसेच सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या पोलीस विभागाचे व पत्रकारांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.