मुंबई- उपनगरातील कांजूर गावमधील अशोक नगरच्या उषा सदन सोसायटीतील परिसरात विद्युत प्रवाह तारेला हात लागल्याने स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक तरुण जखमी झाला आहे. तर दुसरीकडे भांडूप पश्चिम येथील जमील नगर येथील आहिल्या विद्यालय शाळेच्या पटांगणात भले मोठे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. शाळा बंद असल्याने येथे मोठा अनर्थ टळला आहे.
स्वप्निल होलारे(वय 25) असे कांजूर गाव येथील घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेत तरुण 40 टक्के भाजला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अशोक नगर या वस्तीमध्ये टाटा पॉवर कंपनीची विद्युत प्रवाहाची तार येथील घरांच्या अवघ्या काही फूट उंचीवरून गेली आहे. या प्रवाहाचा व्होलटेज प्रचंड प्रमाणात असल्याचे स्थानिक सांगतात. दरम्यान, अशोक नगरातील उषा सदन घराच्या पत्र्यावर चडून स्वप्निल हा इंटरनेट सेवेची वायर टाकत असताना त्याच्या हाताचा स्पर्श टाटा पॉवरच्या हायव्होलटेज तारेला झाला आणि तो जखमी झाला. यावेळी मोठा स्फोट झाला असल्याचे उपस्थित प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.