भंडारा- जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात प्रशासनाने निष्काळजीपणाचा कळस गाठला आहे. प्रशासनाने कोरोनाबाधित आई-मुलीला त्यांच्या घरापासून ते क्वारंटाईन सेंटरपर्यंत पायी येण्यास सांगितले. एवढेच नव्हे तर, महिलांना सेंटरबाहेर रस्त्यावर जवळपास एक ते दीड तास रुग्णवाहिकेची वाट पाहत ताटकळत ठेवण्यात आले. या घटनेची चौकशी व्हावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी तुमसर विधानसभा क्षेत्राच्या आमदारांनी केली आहे.
तुमसर तालुक्यात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आला होता. त्या रुग्णाच्या निकटच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी एक 44 वर्षीय आई व तिची 24 वर्षीय मुलगी हिचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभाग आणि प्रशासनातर्फे होम क्वारंटाईन असलेल्या आई-मुलीला त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. तसेच, तुमसर तालुका रुग्णालयातील रुग्णवाहिका बंद असल्याने तुम्ही क्वारंटाईन सेंटर पर्यंत पायी पोहोचा, तिथून भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाची रुग्णवाहिका तुम्हाला भंडाऱ्याला कोरोना सेंटरमध्ये घेऊन जाईल, असे सांगितले.
अधिकार्यांच्या सूचनेप्रमाणे या आई-मुलीने त्यांच्या घरापासून ते क्वारंटाईन सेंटरपर्यंत पायी प्रवास केला. विशेष म्हणजे सेंटरच्या पुढे आल्यावर अधिकाऱ्यांना फोन करून पोहोचल्याचे संगितले असता, तिथेच थांबा असे सांगून अधिकाऱ्यांनी जवळपास एक ते दीड तास आई-मुलीला रस्त्यावरच रुग्णवाहिकेची वाट पाहात ताटकळत ठेवले. त्यानंतर रुग्णवाहिकेने आई-मुलीला भंडारा येथील कोरोना वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले.
रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णांना असतील त्या ठिकाणावरून पूर्ण काळजी घेऊ कोरोना वॉर्डात भरती करण्याची जबाबदारी ही संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची असते. मात्र आज रविवार असावा म्हणून अधिकाऱ्यांनी याबाबीकडे दुर्लक्ष केला असावा. मात्र अशा पद्धतीचा दुर्लक्षपणा हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करू शकतो. त्यामुळे अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी.
या प्रकरणाची अधिक सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी आणि तुमसर तालुक्याचे तहसीलदार यांना मोबाईलद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. या घटनेची माहिती मिळताच विधानसभेचे आमदार राजू कारेमोरे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून अशा हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.