मल्लापूरम (केरळ)- कुझिमन्ना येथील 9 वर्षीय मोहम्मद फैजचा कागदापासून फूल बनविण्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. मात्र, यात फैजने बनवलेल्या फुलापेक्षा त्याने दिलेले प्रेरणादायी शब्द हे नागरिकांच्या पसंतीस उतरले आहे. इतकेच नव्हे तर, मिलमा केरळ सहकारी दूध विपणन महासंघाने त्याच्या प्रेरणादायी शब्दांचा वापर जाहिरातीसाठी देखील केला आहे.
कागदापासून फूल कसे बनवावे, हे दाखवणारे व्हिडिओ फैज ने आपल्या आईच्या मोबाईलवर त्याच्या वडिलांसाठी व मित्रांसाठी बनवले होते. यात तो फूल कसे बनवायचे याबाबत सांगतही होता. मात्र, कागद कापताना त्याच्याकडून चुका झाल्या. त्यामुळे फूल व्यवस्थित बनले नाही. मात्र, त्यावर दुःख व्यक्त न करता, ”कुणाचे बरोबर बनते, कुणाचे नाही. माझे बनले नाही, पण काही हरकत नाही”, असे उद्गार त्याने काढले. फैजने झाली ती चूक कबूल करून सर्व प्रकाराला सकारात्मकतेने बघितले, ही बाब नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरली. नेटकऱ्यांनी लगेच फैजचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला, आणि त्याला मोटिवेटर असे नाव दिले.