महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

सावकाराचे कर्ज वडील कसे फेडणार या विवंचनेतून 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या, नागपूर जिल्ह्यातील घटना - Gaurav kale suicide susundri

वडिलांची परिस्थिती व वडिलांचे वाढते वय पाहता गौरवला मध्येच महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेतीकडे वळावे लागले. वडिलांना मदत करण्याच्या भावनेतून तो शेती करत होता. त्यामुळे त्याचे एनडीएचे स्वप्नही भंगले होते. गौरव हा वडिलांचा आधार होता. अशात त्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Gaurav kale susundri
Gaurav kale susundri

By

Published : Jul 7, 2020, 3:29 PM IST

नागपूर- सततची नापिकी व वडिलांवरिल कर्जापोटी 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील सुसुंद्री गावात घडली आहे. गौरव चंद्रशेखर काळे, असे मृत तरुणाचे नाव असून वडिलांवरील वाढत्या कर्जाच्या डोंगरामुळे व बहिणीच्या लग्नाच्या चिंतेतून गौरवने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

गौरव हा नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील सुसुंद्री या गावात राहायचा. सततची नापिकी आणि त्यामुळे सावकाराकडून वाढता कर्जाचा बोजा हे सगळे आपले वडील कसे फेडणार, या विवंचनेतून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

गौरवला 3 बहिणी, आई-वडिल असे कुटुंब आहे. गौरव हा स्वभवाने चांगला होता, त्यामुळे आत्महत्येचा विचार कधी तो करेल असे वाटत नसल्याची चर्चा त्याच्या मित्र परिवारात आहे. वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी व शेतीसाठी बँकेंकडून कर्ज काढले होते. परंतु शेतीत वारंवार नापिकी होत असल्याने वडिलांची अवस्था पाहून गौरव अस्वस्थ होत असे. त्यातच बहिणीचे लग्न कसे होणार ही चिंता गौरवला लागून असल्याने त्याने आत्महत्येचा मार्ग अवलंबल्याची चर्चा आहे.

गौरव हा अभ्यासात हुशार होता, त्याला एनडीएमध्ये जायचे होते. त्या दृष्टिकोनातून त्याचे प्रयत्नही सुरू होते. मात्र वडिलांची परिस्थिती व वडिलांचे वाढते वय पाहता त्याला मध्येच महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेतीकडे वळावे लागले. वडिलांना मदत करण्याच्या भावनेतून तो शेती करत होता. त्यामुळे त्याचे एनडीएचे स्वप्नही भंगले होते. गौरव हा वडिलाचा आधार होता. अशात त्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details