नागपूर -आजपासून राज्यात सर्वत्र १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. लसीकरणाच्या माध्यमातूनच कोरोनावर मात करता येणार आहे. त्यामुळे अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने ही मोहीम पार पडण्यास नागरिकांनी मदत करावी. तसेच या संकटावर यशस्वीपणे मात करण्यासाठी नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसुत्रीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सशस्त्र पोलीस दलाकडून देण्यात आलेली मानवंदना पालकमंत्र्यांनी स्विकारली. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.