सातारा- पाटण तालुक्यात काल (30 जून) रात्री नव्याने 6 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून यापूर्वी उपचार सुरू असलेल्या शेजवळवाडी येथील एका 58 वर्षीय पुरुषाचा सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या 6 रुग्णांमध्ये, शेंडेवाडी (कुंभारगाव) येथील 4 व चोपडी, कुसरुंड येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.
तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता तब्बल 101 झाली असून त्यापैकी 63 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. तर आत्तापर्यंत 6 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 32 बाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती उप विभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.आर.बी. पाटील यांनी दिली.
आज आलेल्या अहवालात शेंडेवाडी (कुंभारगाव) येथील 42 व 18 वर्षे पुरुष, 20 व 45 वर्षे महिला असे चौघे, चोपडी येथील 60 वर्षे पुरुष, कुसरूंड येथील 47 वर्षे पुरुष अशा एकूण 6 व्यक्तींचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी कृष्णा रुग्णालय कराड येथे दाखल करण्यात आले आहे. यापैकी बहुतांश व्यक्ती या थेट मुंबईहून आल्या आहेत. त्यांना प्रवासादरम्यान शारीरिक त्रास झाल्याने ते परस्पर रुग्णालयात हजर झाले. त्याठिकाणी त्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्याचे स्वॅब घेण्यात आले. यात या व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर तात्काळ पुढील उपचार करण्यात येत आहे.
या व्यक्तींसोबत आलेले प्रवासातील अन्य सहकारी, कुटुंबीय हे परस्पर गावाकडे गेल्याने त्यांची माहिती घेऊन प्रशासनाने या व्यक्तींच्या संपर्कातील हाय रिस्कमधील व्यक्तींना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन केले आहे. सोमवारी रात्री उशिरा कृष्णा रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या शेजवळवाडी येथील एका 58 वर्षे पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्यावर कोवीड 19 च्या निकषांनुसार कराड येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
काल नव्याने 4 व्यक्तींचे स्वॅब नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सोमवारचे 67 प्रलंबित नमुन्यांचा अहवाल काल रात्री उशिरा येणार असल्याचे समजले होते. या बाधित रुग्णांच्या संपर्कातील कुटुंबीय व नातेवाईक आदी हाय रिस्कमधील व्यक्तींपैकी पाटण कोरोना केअर सेंटरमध्ये 3, प्रियदर्शनी महिला वसतीगृह 47, मिल्ट्री बाॅइज होस्टेल 28, तळमावले कोरोना केअर सेंटरमध्ये 24 अशा एकूण 102 व्यक्तींचे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे.
सध्या 32 बाधित रुग्णांवर कृष्णा व सह्याद्री रुग्णालय कराड, सिव्हिल रुग्णालय सातारा व कोरोना केअर सेंटर पाटण येथे उपचार सुरू असल्याची माहिती श्रीरंग तांबे व डाॅ.आर.बी. पाटील यांनी दिली. दरम्यान तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा शंभरावर गेल्याने आता प्रशासनासह सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. तर सध्या मुबंईतून येणाऱ्या बहुतांशी व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याने त्यांच्यासह त्यांच्या गावांची व कुटुंबियांची चिंता वाढली आहे. कोरोनाला रोखायचे असेल तर आता मुबंईकरांना तात्पुरत्या स्वरुपात रोखणे सार्वत्रिक हिताचे ठरणार आहे. अन्यथा तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्याची दाट शक्यता आहे.