ठाणे- शेजारधर्माला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या एका 23 वर्षीय नराधमाने 5 वर्षीय चिमुरडीवर घरात घुसून बळजबरीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर शहरात घडली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नराधमाला काही तासातच अटक केली आहे.
दीपसिंग उर्फ चपट्या (वय 23) असे नराधमाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर कॅम्प नंबर 4 परिसरात पीडित चिमुरडी कुटुंबासह राहते. तिच्या शेजारी नराधम दीपसिंग राहत असून पीडित चिमुरडी काल एकटीच घरात बसून टीव्ही बघत होती. या संधीचा फायदा घेत शेजारी राहणारा दीपसिंग पीडितेच्या घरात घुसला आणि त्यानंतर बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. अत्याचारानंतर तो नराधम पळून गेला होता.
त्यानंतर पीडित मुलीचे आई-वडील घरी आल्यानंतर घडलेला सर्व प्रकार पीडितेने आपल्या आई-वडिलांना सांगताच त्यांना धक्का बसला. त्यांनी तात्काळ विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेल्या प्रकाराचे पोलिसांसमोर कथन केले असता पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी नराधम दीपसिंगला काही तासातच अटक केली.
तर दुसरीकडे घडलेल्या प्रकाराबाबत परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून नराधमाला जास्तीत जास्त कठोर शिक्षा द्या, अशी मागणी होत आहे. दरम्यान, दीपसिंग हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली आहे. तर आज दीपसिंगला न्यायालयात हजर केले असता त्यास 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.