गडचिरोली- परवापर्यंत कोरोनामुक्त राहिलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा) तालुक्यात 18 जूनला एक तर आज तब्बल 5 रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये एक एसआरपीएफ जवानासह त्याचे वडील व मुलगी पॉझिटिव्ह आढळून आली आहे.
वडसा तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संस्थात्मक विलगिकरणात असलेले एसआरपीएफमधील एक जवान (29 वर्ष), दिल्लीहून परत आलेले त्याचे वडील (52 वर्ष) व मुलगी (17 वर्ष) तर नागपूरहून परत आलेल्या दोन महिला (दोघींचेही वय 50 वर्ष) यांचे कोरोना अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह निघाले. वडसा येथे एसआरपीएफ बटालियन आल्यानंतर सर्वांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी एका जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह मिळाला तर उर्वरित सर्वांचे अहवाल निगेटिव्ह मिळाले आहेत.
जिल्ह्यात नव्याने बटालियन दाखल झाल्यानंतर सर्वच सदस्यांना 14 दिवसाच्या विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यानंतर दिल्ली येथून वडील व मुलगी देसाईगंज येथे आल्यानंतर त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यांचेही अहवाल पॉझिटिव्ह मिळाले आहेत. तर दोन महिला नागपूरहून वेगवेगळ्या दिवशी वडसा येथे आल्यानंतर त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यापैकी एक महिला एक दिवस घरी राहिल्यानंतर तिला दुसऱ्या दिवशी विलगीकरणात हलविण्यात आले. या महिलेच्या संपर्कात आलेल्या तीव्र जोखमीच्या सर्व व्यक्तींनाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
सुरुवातीला शहरातील एक रुग्ण आढळून आल्यानंतर आज पून्हा वडसा येथे 5 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 60 झाली. तर यापैकी एकूण 42 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. सध्या 17 कोरोनाबाधितांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. त्यापैकी 16 गडचिरोली येथे तर 1 नागपूर येथे कोरोना निदान झाल्यामुळे त्याच ठिकाणी उपचार घेत आहे.