लातूर- निलंगा शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता शहरातील व्यापारी व सामाजिक संघटनांनी एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सर्व व्यापाऱ्यांनी एक मतानी शहरात 5 दिवस स्वयंघोषित बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयी प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही कळविण्यात आले. परंतु त्यांनी शासकीय बंदला परवानगी दिली नाही व स्वयंघोषित बंदला आमचा विरोध पण नाही, अशी भूमिका घेतली आहे.
सर्व व्यापाऱ्यांनी शहरातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा बघता हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शहरात 3 दिवसात एकूण 19 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. दत्त नगर, दादापीर दरगाह परिसर, इंदिरा चौक, कुडुंबले रुग्णालय परिसर, इंदिरा कन्या शाळा परिसर हा कन्टेन्मेंट झोनमध्ये आहे.