ठाणे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणत वाढताना दिसत आहे. असे असताना गेल्या तीन दिवसात नव्याने ४४६ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर आज (रविवारी) एका दिवसात १०१ रुग्ण आढळून आले असून गेल्या तीन दिवसांपासून रुग्णांचा आकडा शंभरी पार करीत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
शुक्रवारी १८५ रुग्ण, शनिवारR १६० तर रविवारी १०१ कोरोनाबाधित रूग्णांची संख्या पाहता महापालिका क्षेत्रातील नागरिकांमध्ये भीती पाहायला मिळत आहे. तर कोरोना रुग्णाचा प्रादुर्भाव मोठा प्रमाणात चाळ आणि झोपडपट्ट्यात वाढल्याचे दिसून आले आहे. कल्याण डोबिंवली क्षेत्रातील सध्या तब्बल १ हजार ७६ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर रुग्णालयातून कोरोनामूक्त होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या १ हजार १३ वर पोहोचवली आहे. तर आजपर्यंतचा कोरोनामुळे मृत्यूचा एकूण आकडा ६० वर गेला आहे.
महापालिका प्रशासनाने रुग्णांची विगतवारी शुक्रवार पासून प्रसिद्धी माध्यमांना देणे बंद केल्याने महापालिका हद्दीत रविवारी आढळून आलेले १०१ रुग्ण कुठल्या परिसरातील आहेत. हे समजू शकले नाही. मात्र, आजपर्यंत महापालिका हद्दीत २ हजार १७७ रुग्णांची नोंद असल्याचे सांगण्यात येत आहे. यापैकी ६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पावसाळ्याच्या सुरवातीलाच कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार करावे. तसेच नागरिकांनी सरकारने आणि पालिका प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. मात्र, शहरात नागरिकांकडून सूचनांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळेच तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांचा आकडा शंभरी पार गेला आहे. गेल्या तीनच दिवसात तब्ब्ल ४४६ रुग्ण वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे.
महापालिका प्रशासनाने एक दिवसाआड दुकाने सुरू करण्याची परवानगी दुकानदारांना दिली आहे. मात्र, दोन्ही बाजूने दुकानदार व्यवसाय करत आहेत. तर काही दुकानदारांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले. तरीही दुकानांचे शटर उघडे असल्याने नागरिकही पावसाळापूर्वीच्या खरेदीसाठी मोठ्याप्रमाणात रस्त्यावर उतरल्याचे दिसून येत आहे.