धुळे- जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड कक्षात 3 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 1 हजार 429वर पोहोचली आहे.
धुळे : 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह - 3 Corona death dhule
धुळे जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 429वर पोहोचली असून आत्तापर्यंत 900 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
धुळे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. शहरातील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण चिंता वाढवणारे असून जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असलेल्या शहरातील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात तिरंगा चौकातील 70 वर्षीय वृद्धाचा, साक्री रोड भागातील 40 वर्षीय महिलेचा आणि 60 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. या तिघांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या 72 वर पोहोचली आहे.
मृतांमध्ये सर्वाधिक 37 धुळे महापालिका क्षेत्रातील आहे, तर 35 जण जिल्ह्यातील इतर तालुक्यातील रहिवासी आहेत. एकीकडे रुग्णांचा मृत्यू टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी टास्क फोर्स स्थापन करून उपाययोजना करण्याचे आदेश दिले असताना 3 जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा देखील हादरली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घेण्यात आलेले 74 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 5 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच धुळ्यातील खाजगी लॅबमधील एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यात एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1 हजार 429 वर पोहोचली असून आत्तापर्यंत 900 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.