वर्धा- वर्ध्या पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यावर 9 जुनला घरात घुसून चाकूने हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या आधारे तिघांना अटक केली आहे. याचा मुख्य सूत्रधार हा जिल्हा परिषदेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आजूबाजूला असणारा अमोल वनकर असल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेत कोरोना काळात साहित्य पुरवण्याच्या कंत्राटावरून हा हल्ला झाल्याचे पुढे आले. सुरवातील हा हल्ला जखमी करण्याच्या उद्देशाने झाला असावा असे वाटत होते. मात्र रामनगर पोलिसांनी केलेल्या तपासात हा हत्येचा कट असल्याचे उघडकीस आले.
वर्धा पंचायत समितीत विस्तार अधिकारी म्हणून हेमंत देवतळे कार्यरत आहे. 9 जूनला घरात असताना कुणाल इखार नामक व्यक्तीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. यात हेमंत देवतळे थोडक्यात बचावले होते. हल्लेखोर इखार याच्यावर जिवे मारण्याच्या प्रयत्नाचे गुन्हे असून तो सराईत गुन्हेगार आहे. रामनगर पोलिसांनी विस्तार अधिकारी हेमंत देवतळेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता व कुणाल इखार याला ताब्यात घेतले होते.
त्यानंतर तब्बल 50 दिवसांच्या कालावधी नंतर तांत्रिक पुरावे, तसेच कुणाल इखारकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, शेख ताहीर अब्दुल गफार, ज्याची आधीच पोलिसांच्या रेकॉर्डवर गुन्हेगार म्हणून नोंद आहे, त्याने कुणाल इखार याला 40 हजार रुपयात हत्येची सुपारी दिल्याचे उघडकीस आले. हा कट जिल्हा परिषदेत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत राहणारा अमोल वनकर याच्या सांगण्यावरून रचला असल्याचे तपासात पुढे आले. यात तांत्रिक पुरावे मिळाल्याने तिघांवर हत्येचा कट रचून जिवे मारण्याची सुपारी दिल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
केवळ 40 हजारात जिवे मारण्याचा कट