ठाणे- कोरोनाचा प्रार्दुभाव असताना व लॉकडाऊन आणि कर्फ्यूचे सर्व नियम झुगारून उल्हासनगरच्या एका सभागृहात लग्न समारंभ पार पडल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या लग्न समारंभात जवळपास 70 ते 80 जण उपस्थित होते. या संदर्भात स्थानिक पोलिसांना माहिती मिळताच कारवाई करून उल्हासनगर पोलीस ठाण्यात 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू पुरुषोत्तम नरसिंघानी, मोहनलाल पिरवानी (67) आणि नासिर शेख (42) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. उल्हासनगर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजारच्या वर गेली आहे. अनेक क्षेत्र कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. अशी परिस्थिती असताना उल्हासनगर - 1 या ठिकाणी हेमराज डेअरी जवळ असलेल्या पंचायत हॉल या ठिकाणी काल दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उल्हासनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे, पोलीस नाईक बी.बी आव्हाड व पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन कारवाई केली.