महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

मुंबईत मलेरियाचा धोका वाढला, केवळ 12 दिवसात आढळले 236 रुग्ण - Maleria patients number Mumbai

डॉ. गोमरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात (20 जून) 328 रुग्ण आढळले होते. तर गेल्या वर्षी अर्थात जून 2019 मध्ये 313 तर जुलै 2019 मध्ये 428 मलेरियाचे रुग्ण आढळले होते. असे असताना जुलैमध्ये केवळ 12 दिवसात मलेरिया रुग्णांचा आकडा थेट 236 वर पोहोचल्याने पालिकेची चिंता वाढली आहे.

Maleria Mumbai
Maleria Mumbai

By

Published : Jul 15, 2020, 4:55 PM IST

मुंबई - मागील 4 महिन्यांपासून मुंबईकर कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यात आता मुंबईकरांची चिंता आणखी वाढणार आहे. कारण गेल्या 12 दिवसात मुंबईत मलेरियाचे 236 रुग्ण आढळले आहेत. हा आकडा चिंताजनक असून आता मुंबईकरांनी विशेष काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे. मलेरियाची लागण झाल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि अशावेळी कोरोना संसर्ग होण्याचा धोका अधिक वाढण्याची शक्यता डॉक्टर व्यक्त करत आहेत.

दरवर्षी पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू , लेप्टो आणि गॅस्ट्रो असे आजार वाढतात. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यापूर्वी या आजाराचे कारण असलेले डास नष्ट करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेकडून दरवर्षी विशेष मोहीम राबविली जाते. यंदाही विविध ठिकाणी पालिकेने साफसफाई करत अळ्या नष्ट केल्या आहेत. पण कोरोना काळात पालिकेचे अधिकाधिक मनुष्यबळ कोरोनाचा नायनाट करण्याच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे, यंदा स्वच्छतेचे काम कमी प्रमाणात झाले आहे. परिणामी पावसात पाणी साचणे, गटारी तुंबणे अशा घटना घडत असून डासांची उत्पत्ती वाढत आहे.

यातूनच 1 ते 12 जुलै दरम्यान 236 मलेरियाचे रुग्ण आढळले आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी डॉ. मंगला गोमरे यांनी ही माहिती दिली आहे. डॉ. गोमरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात (20 जून) 328 रुग्ण आढळले होते. तर गेल्या वर्षी अर्थात जून 2019 मध्ये 313 तर जुलै 2019 मध्ये 428 मलेरियाचे रुग्ण आढळले होते. असे असताना जुलैमध्ये केवळ 12 दिवसात मलेरिया रुग्णांचा आकडा थेट 236 वर पोहोचल्याने पालिकेची चिंता वाढली आहे. याचे आणखी एक कारण म्हणजे कोरोनाच्या संकटात मलेरिया वाढला तर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.

जुलैमध्ये मलेरियाचे रुग्ण खूप वाढले आहेत. त्यामुळे आता आवश्यक त्या उपाययोजनांना वेग देण्यात आला आहे. तर सध्या सर्व पालिका रुग्णालय कोविड रुग्णालयात रुपांतरित झाले आहेत. पण मलेरिया-डेंग्यूसह इतर पावसाळी आजाराच्या रुग्णांसाठी ही बेड राखीव ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानुसार सर्व पालिका रुग्णालयात काही बेड या रुग्णांसाठी ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्याचे डॉ. गोमारे यांनी सांगितले आहे. तर नागरिकांनीही आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान डेंग्यूची ही भीती या काळात आहे. पण गेल्या 12 दिवसात डेंग्यूचे 236 रुग्ण आढळले आहेत. तर लेप्टोचेही 2 रुग्ण आढळले असून गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या 21 वर आहे. कोरोनाचा कहर सुरू असताना मलेरिया-डेंग्यू वाढणे आणखी धोकादायक आहे. कारण मलेरिया-डेंग्यू-गॅस्ट्रो आजार रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो. तर रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती अधिक असते. असे झाल्यास रुग्णांचा धोका वाढण्याची भीती असते. त्यामुळे आता मुंबईकरांनी आणखी काळजी घेण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया धारावीतील कोरोना योध्दा आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अनिल पाचणेकर यांनी दिली आहे.

घरात वा घराच्या आसपास डास होणार नाहीत, पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, योग्य आहार घ्यावा असे आवाहनही डॉ. पाचणेकर यांनी केले आहे. तर ताप-थंडी, उलटी, डोकेदुखी आणि थकवा ही लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहनही डॉ. पाचणेकर यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details