मुंबई- कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनच्या संकटात यावर्षी पणन विभागाने विक्रमी २१९.४९ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. गेल्या दहा वर्षातील ही विक्रमी कापूस खरेदी असल्याचा दावा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केला आहे.
यासंदर्भात माहिती देताना सहकार मंत्री पाटील म्हणाले, राज्यात हंगाम २०१९-२० मध्ये ४४.३० लाख हेक्टर कापसाची लागवड झाली. पर्जन्यमान सामान्य झाल्यामुळे कापसाचे विक्रमी पीक झाले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कापसाच्या दरामुळे देशा अंतर्गत व राज्या अंतर्गत कापसाचे दर हे कमी होत गेले. शेतकऱ्यांना हमी दरापेक्षा कमी दराने कापसाची विक्री करण्याची वेळ येवू नये याकरिता राज्यात कापूस पणन महासंघाची नियुक्ती सीसीआयचे सबएजंट म्हणून करण्यात आली.
सर्वप्रथम राज्यामध्ये ४० कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. सातत्याने कापसाचे पडणारे दर तसेच कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव आणि वस्त्रोद्योगावर त्याच्या प्रभावामुळे बाजारपेठेमध्ये खाजगी खरेदीदारांची संख्या कमी होत गेली, असेही सहकार मंत्र्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना त्रास होऊ नये आणि कापूस खरेदीला विलंब होऊ नये यासाठी सीसीआय व कापूस पणन महासंघाद्वारे अधिकचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. कापूस पणन महासंघाद्वारे परिस्थितीनुरूप १२७ कापूस खरेदी केंद्रे कोरोना पूर्वी सुरू करण्यात आली होती. कापूस पणन महासंघाकडील पुरेसा सेवक वर्ग उपलब्ध नसल्याने अधिकचे खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी आपत्कालीन परिस्थिती पाहून शासनाने कृषी विभागातील कृषी पदवीधर सेवकांची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली आणि नवीन कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यात आलीत.
हंगाम २०१९-२० मध्ये एकूण १९० कापूस खरेदी केंद्रांवर कापूस पणन महासंघाद्वारे कापूस खरेदीचे कामकाज सुरू आहे. कापूस पणन महासंघाद्वारे हंगाम २०१९-२० मध्ये एकूण ३.३३ लाख शेतकऱ्यांकडून कापसाची खरेदी करण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एप्रिल महिन्यात कापसाची खरेदी स्थगित ठेवावी लागल्यामुळे शेतकऱ्यांची प्रतिक्षा यादी वाढत गेली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी पावसाळ्यामध्ये देखील मान्सून शेड उभारून कापूस खरेदी मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.
राज्यात प्रथमच जून व जुलै महिन्यामध्ये कापसाची खरेदी करण्यात येत आहे
शेतकऱ्यांकडून एकूण ४ हजार ६०० कोटी रुपयांची कापूस खरेदी करण्यात आली. बहुतांश कापूस हा खरीप २०२०-२१ च्या पेरणी पूर्वी खरेदी करण्यात आला असून शेतकऱ्यांची देयके देखील तत्पूर्वी देण्यात आली आहेत.
हंगाम २०१९-२० मधील पणन महासंघाद्वारे हमीभावाने केलेली खरेदी
राज्यात हंगाम २०१९-२० करिता कापूस पीक-पेरा खलील क्षेत्र - ४४.३० लाख हेक्टर
अपेक्षित कापूस उत्पादन – ४०७ लाख क्विंटल (कृषी विभागानुसार)