मुंबई- जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने मुंबईला आपला हॉटस्पॉट बनवला आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या शहरात स्वच्छता राखणाऱ्या मुंबई महापालिकेच्या तब्बल 2 हजार 198 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून 103 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 150 कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. मृतांमध्ये पालिकेच्या एका उपायुक्ताचा तसेच एका सहाय्यक आयुक्ताचा समावेश आहे.
मुंबई महापालिकेच्या 2 हजार 198 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 103 जणांचा मृत्यू - Corona hotspot mumbai
रुग्णाच्या संपर्कात आल्याने, रुग्ण असलेल्या ठिकाणी गेल्याने पालिकेच्या 2 हजार 198 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 1 हजार 150 कर्मचाऱ्यांनी कोरोनवर मात केली आहे. तर 103 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पालिकेचे उपायुक्त शिरीष दिक्षित आणि सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचाही कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे.
मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. 22 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. देशभरात लॉकडाऊन सुरू असताना मुंबईत रोज कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत होते. या रुग्णांवर उपचार करण्याचे काम पालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स आदी कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. मुंबईत स्वच्छता ठेवण्याचे काम पालिकेचे सफाई कर्मचारी करत आहेत. तर मुंबईकरांना पाणी पुरवठा करण्याचे काम पालिका कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. लॉकडाऊन सुरू असताना रस्त्यावर राहणारे नागरिक, हातावर पोट असलेले कामगार, कोरोना झालेले रुग्ण, रुग्णाच्या संपर्कात असलेले संशयित रुग्ण आदींना रोज जेवणाची पाकिटे पोहोचवण्याचे काम पालिका कर्मचारी, अधिकारी करत आहेत. रुग्ण आढळून आला त्या ठिकाणी औषध फवारणीचे कामही पालिका कर्मचारी करत आहेत.
या कामादरम्यान रुग्णाच्या संपर्कात आल्याने, रुग्ण असलेल्या ठिकाणी गेल्याने पालिकेच्या 2 हजार 198 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 1 हजार 150 कर्मचाऱ्यांनी कोरोनवर मात केली आहे. तर 103 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पालिकेचे उपायुक्त शिरीष दिक्षित आणि सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचाही कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसाला 50 लाख रुपये आणि अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.