परभणी- आज सेलू शहरातील 2 महिला रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 98 एवढी झाली आहे. विशेष म्हणजे, त्यापैकी जवळपास 89 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित 6 जणांवर परभणीच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहेे.
दरम्यान, कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सेलू येथील हसमुख कॉलनीचा संपूर्ण परिसर सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण 2 हजार 582 संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी 2 हजार 551 रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. यातील आजपर्यंत 98 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, 4 रुग्णांचा अहवाल प्रलंबित होता. तसेच 80 रुग्णांचे अहवाल अनिर्णित असून 47 रुग्णांचे अहवाल तपासण्याची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा नांदेडच्या गुरुगोविंदसिंह वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेने दिला आहे.
दरम्यान काल सायंकाळी परभणीत 9 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यात एकही अहवाल पॉझिटिव्ह नव्हता, मात्र आज सकाळी पुन्हा नांदेडच्या प्रयोगशाळेत प्रलंबित असलेल्या 4 व्यक्तींचे अहवाल आलेत. त्यातील सेलू येथील हसमुख कॉलनीतील 2 तरुण मुलींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ज्यामुळे परभणी जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 98 वर पोहोचली आहे. दरम्यान यापूर्वी संशयीतम्हणून दाखल झालेल्या रुग्णांपैकी 8 रुग्ण सध्या परिस्थितीत संसर्गजन्य कक्षात दाखल आहेत, तर विलगीकरण कक्षात 83 रुग्णांना ठेवण्यात आले आहे.
तसेच यापूर्वी 2 हजार 491 रुग्णांनी विलगिकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे. त्यामध्ये परदेशातून आलेले 62 रुग्ण होते आणि त्यांच्या संपर्कातील 6 रुग्णांचा समावेश आहे. एकूणच परभणी जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 89 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 3 रुग्णांचा मृत्यू झाल्याने उर्वरित 6 रुग्णांवर सद्यपरिस्थितीत परभणीच्या कोरोना रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दुपारी बारा वाजता सेलू शहरातील हसमुख कॉलनी सील करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय, संपूर्ण कॉलनीत निर्जंतुकीकरणाचे आदेश दिले असून, त्यानुसार काम सुरू झाले आहे. तर पोलिसांकडून कॉलनीला सील करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.