मुंबई- राज्यात कोरोना विषाणू संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले असून याचे व संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात राज्यभरात पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत कलम 188 नुसार महाराष्ट्र पोलिसांनी 2 लाख 15 हजार 900 गुन्हे दाखल केले असून राज्यभरात क्वारंटाइनचा नियम मोडणाऱ्या 824 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरातील 323 प्रकरणात पोलिसांवर हल्ला झाला असून याप्रकरणी 883 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस खात्यातील आतापर्यंत 9 हजार 96 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 937 पोलीस अधिकारी, तर 8 हजार 159 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या राज्यात 1 हजार 912 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह असून ते उपचार घेत आहे. यात 207 पोलीस अधिकारी तर 1 हजार 705 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.