नवी मुंबई -नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांनी साडेचार हजारांचा आकडा पार केला असून आजही चक्क 172 नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढतच आहे. आज 80 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. कोरोनामुळे आज 10 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
गेल्या 10 ते 15 दिवसात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या नवी मुंबईत झपाट्याने वाढत आहे. हे वाढलेले रुग्ण प्रशासनाच्या चिंतेत भर टाकत आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईत 4 हजार 698 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवाशी होते.
आत्तापर्यंत नवी मुंबईत 16 हजार 634 लोकांची कोविड 19 ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 11 हजार 274 जण निगेटिव्ह आले असून, 673 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबीत आहे. सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 4 हजार 687 इतकी आहे.