पाटण (सातारा) -नदीवर पोहण्यासाठी गेलेला 15 वर्षांचा शाळकरी मुलगा आपल्या वडिलांसमोर कोयना नदीपात्रात वाहून गेल्याची घटना घडली. ही घटना पाटण तालुक्यातील निसरे येथे घडली. विश्वजीत विकास पंडित (रा. मल्हारपेठ, ता. पाटण) असे मुलाचे नाव आहे. दरम्यान, नदीपात्रात शोध घेऊनही तो सापडलेला नाही.
वडिलांच्या डोळ्यांदेखत कोयनेत 15 वर्षांचा मुलगा गेला वाहून, सापडला नाही मृतदेह - 15 years body drowned koyna river
विश्वजीत याचे वडील विकास पंडित हे मूळचे विटा (जि. सांगली) येथील आहेत. व्यवसायानिमित्ताने ते पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे स्थायिक झाले आहेत. आपल्या मित्रांसमवेत मुलांना घेऊन ते निसरे येथे कोयना नदीला पोहायला गेले होते.

विश्वजीत याचे वडील विकास पंडित हे मूळचे विटा (जि. सांगली) येथील आहेत. व्यवसायानिमित्ताने ते पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे स्थायिक झाले आहेत. आपल्या मित्रांसमवेत मुलांना घेऊन ते निसरे येथे कोयना नदीला पोहायला गेले होते. नदीवरील जुन्या फरशी पुलाजवळ विश्वजीत हा मित्रांसोबत पोहत असताना नदीतील पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो पुलाखालील म्होरीतून वाहून गेला. विश्वजीत वाहून जात असल्याचे पाहून मुलांनी आरडाओरड केली. त्यांच्या आवाजामुळे नदीकाठावर थांबलेले त्याचे वडील विकास पंडीत आणि त्यांच्या मित्रांनी विश्वजीतचा नदीपात्रात शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही.
माहिती मिळताच, परिसरातील तरूणांनी नदीपात्रात उतरून शोधाशोध केली. तरीदेखील विश्वजीत सापडला नाही. सध्या कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यातच गेली चार दिवस अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याची वाढली आहे. तसेच पाण्याला गतीही आहे. उन्हाळ्यामुळे नागरिक आणि लहान मुलांची पोहण्यासाठी नदीला गर्दी होत असून लहान मुलांचा बुडून मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटना घडत आहेत. बुधवारी पाटण तालुक्यातील वांग नदीत बुडून मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पाटण तालुक्यातील निसरे येथे मुलगा नदीतून वाहून गेल्याची घटना घडली आहे.