हिंगोली- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये अजून 12 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे आता संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात 18 जुलैपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत, तर आता चहा आणि पान टपरी देखील बंद करण्याचे नवीन आदेश काढले आहेत. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंगोलीत नव्याने आढळले 12 कोरोनाबाधित रुग्ण; संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी - 12 new corona patients hingoli
हिंगोली जिल्ह्यांमध्ये आता 328 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील 272 रुग्ण हे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या उपचारामुळे बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आज घडीला 52 रुग्णांवर विविध कोरोना वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.

नव्याने आढळलेल्या 12 पैकी एक कोरोनाबाधित रुग्ण हा हिंगोली तालुक्यातील नवलगव्हाण येथील रहिवासी असून त्याला सारीचा आजार झाल्याने हिंगोली येथील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. मात्र, सदरील रुग्णाचा बाहेर गावावरून येण्याचा कोणताही पूर्वइतिहास नाही. तर, कळमनुरी क्वारंटाइन सेंटर अंतर्गत दोन व्यक्तीचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले असून, 3 वर्षांची मुलगी ही (रा. नवी चिखली) कोरोना रुग्णाच्या संपर्कातील आहे. तर दुसरा 38 वर्षीय व्यक्ती हा नांदापूरचा रहिवासी असून, तो मुंबई येथून गावाकडे आलेला आहे. वसमत क्वारंटाइन सेंटर अंतर्गत 9 कोरोनाबाधित आढळले आहेत. हे सर्व वसमत शहरातील शुक्रवार पेठ आणि रेल्वे स्टेशन रोड परिसरातील आहेत. हे सर्वजण एका कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले असल्याने त्यांना शासकीय क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांचे स्वॅब घेऊन प्रयोग शाळेकडे पाठविले असता, सर्वांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. एक कोरोनाबाधित रुग्ण बरा झाल्याने त्याला सुट्टी देण्यात आली आहे.
एकंदरीत हिंगोली जिल्ह्यांमध्ये आता 328 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील 272 रुग्ण हे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या उपचारामुळे बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला 52 रुग्णांवर विविध कोरोना वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.