सोलापूर- बेकारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या रिक्षाचालकांनी 10 हजार रुपये उदरनिर्वाह अनुदान देण्याची मागणी केली आहे. शहरातील 11 हजार रिक्षाचालकांनी व्यक्तीगतरित्या अर्ज करून जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी केली आहे. माकपचे नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज सादर केले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात मागील 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये रिक्षा चालकांचा व्यवसाय बंद झालेला आहे. सोलापुरातील रिक्षाचालक बेकार व बेरोजगार झाल्याने उदरनिर्वाहाकरता 10 हजार रुपये अनुदान शासनामार्फत उपलब्ध करून देण्याची मागणी रिक्षाचालकांनी केली आहे. शहरातील 10 हजार 971 रिक्षा चालकांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे व्यक्तीगत अर्ज सादर केले आहेत. ज्येष्ठ कामगार नेते व माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणीचे अर्ज सादर केले आहेत. यामध्ये रिक्षाचालकांनी रिक्षा खरेदीकरता घेतलेले सरकारी, सहकारी, खासगी वित्तीय संस्थानांच्या कर्जावरील व्याज माफ करून रिक्षा चालकांचे कर्ज पुनर्गठीत करण्यात यावे, गेल्या तीन महिन्यांपासून ऑटोरिक्षा बंद असल्याने या ऑटोरिक्षाचा विमा, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण, प्रदूषण प्रमाणपत्र नुतनीकरण, परवाना नुतनीकरण व वाहनाची आयुमर्यादा, एक वर्षाने वाढवून देण्यात यावी, आशा मागन्या करण्यात आल्या आहेत.