सिंधुदुर्ग - गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पोमधून अनधिकृत दारु वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार रविवारी पहाटे सापळा रचून गोवा- मुंबई महामार्गावरील ओसरगाव येथील टोलनाक्यानजीक दारु वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला. या कारवाईत जवळपास ९ लाख रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली. मात्र संशयित पसार झाले आहेत. तर आजरा फाटा येथे १ लाख ४० हजारांच्या दारुसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुठ्ठ्यांच्या मधोमध दारूच्या बाटल्यांचे बॉक्स
मुबंई- गोवा महामार्गावर ओसरगाव येथे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो (जीजे०६- एक्स ७८९८) पोलिसांनी थांबवला. मात्र चालक व क्लिनर टेम्पोमधून उतरून अंधाराचा फायदा घेऊन पळाले. पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता हौद्यात पुठ्ठ्यांच्या मधोमध दारूच्या बाटल्यांचे बॉक्स आढळून आले.
महामार्गावर 9 लाखाची दारू जप्त
पोलिसांनी ९ लाखांची दारू जप्त केली आहे. त्यात २ लाख ६८ हजार ८०० रुपयांच्या जस्टर ग्रीन प्रिमियरच्या ३३६ बाटल्या, ३ लाख ३ हजार ६०० रुपयांच्या जेलीडस प्रिमीयम व्होडकाच्या २७६ बाटल्या, ३ लाख १६ हजार ८०० रुपयांच्या जस्टर ऑरेंज फ्लेव्हर व्होडकाच्या ३९६ बाटल्या, असा मिळून ८ लाख ८९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल; तसेच ७ लाख रुपयांचा आयशर टेम्पो पोलिसांनी जप्त केला. कारवाईमध्ये सहाय्यक निरीक्षक बापू खरात, शिवाजी सावंत, राजेश उबाळे, कॉन्स्टेबल रुपेश गुरव, नितीन बनसोडे, होमगार्ड पवार आदी सहभागी झाले होते. फिर्याद कॉन्स्टेबल नितीन बनसोडे यांनी दिली. त्यानुसार अनोळखी संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आाला आहे.
आजरा फाटा येथेही 1 लाख 40 हजारांच्याया दारुसह दोघे ताब्यात
महामार्ग पोलिसांनी धडक कारवाई करीत सावंतवाडी येथील आजरा फाटा येथे १ लाख ४० हजार रुपयांची अवैध दारू तसेच ६ लाख रूपयांची चारचाकी गाडी असा एकूण ७ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दोन संशयित आरोपीना ताब्यात घेतले आहे. गाडी क्रमांक (एम. एच. ०४ एच. एन २६६९) घेऊन चालक केतन केशव तांडेल ( रा. सावरकर नगर, ठाणे ) हा आजरा फाट्यावर आला. त्याच्यासोबत सुमित सुनील नलावडे (रा. सावरकर नगर, ठाणे ) हा होता. यावेळी पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता १ लाख ४० हजार रुपयांची अवैध दारू सापडली. या वेळी पोलिसांनी १ लाख ४० हजार रुपयांची अवैध दारू तसेच ६ लाख रूपयांची चारचाकी गाडी, असा एकूण ७ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दोन्ही संशयित आरोपीना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव, हवालदार वेंगुर्लेकर, पोलिस नाईक पाटील, पोलीस शिपाई चिंदरकर, आदी सहभागी झाले होते.