जगातल्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये 'या' एकमेव भारतीय खेळाडूचे नाव
2019-02-14 19:30:13
जगातल्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये 'या' एकमेव भारतीय खेळाडूचे नाव
मुंबई - सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेट संघात एकपेक्षा एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहेत. कर्णधार विराट कोहली, हिटमॅन रोहित शर्मा हे सर्व सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांच्या वर्गात मोडतात. यापूर्वी मोहम्मद अझरुद्दीन, अजय जडेजा सारख्या खेळाडूंचा क्षेत्ररक्षणात दबदबा होता. जगातील सर्वोत्तम पाच क्षेत्ररक्षक असलेल्या खेळाडूंच्या यादीत केवळ एका भारतीयाची निवड करण्यात आली आहे.
जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जाणारा आणि फिल्डिंगचा बादशाह, दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सने या पाच खेळाडूंची निवड केली आहे. त्यात भारतीय संघाच्या सुरेश रैनाची निवड केली आहे. जाँटी याचा हा व्हिडिओ आयसीसीने शेयर केला आहे.
जॉन्टी ऱ्होड्सने निवडलेल्या पाच सर्वोत्तम क्षेत्ररक्षकामध्ये ऑस्ट्रेलियाच्या अँड्रयू सायमंड्सचे नाव आहे. यासोबत दक्षिण आफ्रिकेचा हर्शल गिब्स आणि एबी डिविलियर्स तसेच इंग्लंडचा माजी कर्णधार पॉल कॉलिंगवूड या यादीत सामील आहेत.
सुरेश रैनाच्या बाबतीत जाँटी बोलताना म्हणाला, की भारतीय मैदानात गवत कमी असते. येथे क्षेत्ररक्षण करताना बऱ्याच अडचणी येतात. तरीही रैना स्लिप आणि आउटफिल्डमध्ये उत्तम क्षेत्ररक्षण करतो. जगातल्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकात समावेश केल्याने सुरेश रैनाने जाँटीचे आभार मानले आहेत.