नवी दिल्ली– पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव हे मोठे भूमीपुत्र होते. त्यांना खऱ्या अर्थाने देशाच्या आर्थिक सुधारणांचे पितामह म्हणता येईल, असे मत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले. ते तेलंगणा काँग्रेसच्या ऑनलाईन कार्यक्रमात बोलत होते.
पंतप्रधान नरसिंह राव यांच्या कार्यकाळात मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदा 1991 मध्ये अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांनी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या आठवणींचे स्मरण हे जन्मशताब्दीच्या सोहळ्यात केले. ते म्हणाले, की पी. व्ही. नरसिंह राव यांच्याकडे भविष्याबाबतची दृष्टी आणि त्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी धाडस होते. या अर्थसंकल्पाने आधुनिक भारताची पायाभरणी करण्यात आली. देशातील आर्थिक सुधारणांना या अर्थसंकल्पाने देशाला दिशा दाखवून दिली.
पहिला अर्थसंकल्प राजीव गांधींना समर्पित करण्यात आला होता. मनमोहन सिंग यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाने उदारीकरणाचे धोरण आणि नव्या आर्थिक सुधारणांची अनेक मार्ग खुली झाली होती. उदारीकरणाचा निर्णय हा अवघड पर्याय आणि धाडसी निर्णय होता. केवळ पंतप्रधान नरसिंह राव यांनी स्वातंत्र्य मला दिल्याने त्या गोष्टी घडून आल्या होत्या, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितले. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मदत होणार असल्याची त्यांना पूर्ण कल्पना होती, असेही माजी पंतप्रधानांनी सांगितले.